राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्यावरुन खोचक टोला लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात फरक नाही”, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले ?

“सोलापूरमधील सर्व स्थानिक नेते आज येथे उपस्थित आहेत. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार पक्षाने दिले आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहेत. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. याबाबत आज त्यांना विनंती केली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. सोलापूर जिल्हा नेहमीच पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे”, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : “यांना इतक्या ताकदीनं पाडा की…”, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!

शरद पवार यांची भाजपावर टीका

“आश्वासने देणे हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआयचा गैरवापर करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्यात काही फरक नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत”, असे शरद पवार म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पंतप्रधान मोदी यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. त्यांनी गेल्या निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने आजही पूर्ण केलेली नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना जाऊन किती वर्ष झाले, त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे. पण पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात”, असे शरद पवार म्हणाले.