दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर देशभरातले सर्व विरोधी पक्ष केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. इंडिया आघाडीमधील सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानेही या अटकेचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे. देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात असं धोरण असतं. राज्यांच्या मंत्रिमंडळाला हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. कदाचित त्यात काही चुकलं असेल. परंतु, त्यासाठी भाजपाने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा, यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावं. त्यांनी या प्रकरणी यापूर्वीच दोन-तीन जणांना अटक केली आहे. आता राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. राज्याचं धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे.

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. त्यांचे १०० उमेदवार निवडून येतील. दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांच्या थोबाडीत लगावतील.

हे ही वाचा >> Kejriwal Arrested : “मोदी घाबरट हुकूमशहा”, राहुल गांधींची कडवी टीका; म्हणाले, “त्या असुरी शक्तीला…”

भाजपा देशभर त्यांची दहशत निर्माण करत आहे. यापूर्वी कोणत्याही सत्ताधाऱ्याने असं केलं नव्हतं. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहणार. मी इंडिया आघाडीचा घटक म्हणून सांगतोय की, या परिस्थितीत आम्ही केजरीवाल आणि आपच्या पाठिशी उभे आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar says aap wil win lok sabha vidhan sabha election in delhi kejriwal arrest asc
First published on: 22-03-2024 at 09:51 IST