नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. तसेच सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा पाठिंबा काँग्रेसला मिळाल्यानंतर ही संख्या ३१ वर पोहोचली. तर महायुतीला अवघ्या १७ जागा जिंकता आल्या. ४ जून रोजी निकाल लागल्यानंतर आज जवळपास ११ दिवसांनी मविआच्या नेत्यांनी एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि महाराष्ट्रातील मतदारांचे या विजयाबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी ज्या ज्या मतदारसंघात सभा घेतल्या, रोड शो घेतले, त्या त्या ठिकाणी मविआच्या उमेदवारांचा विजय झाला. मोदींनी १८ सभा आणि एक रोड शो घेतला होता. त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला. म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या अधिक सभा आणि दौरे होतील. तेवढे आम्हाला स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद दिले पाहीजेत.”

“भाजपाचा अजिंक्यपणा फोल, लोकसभा अंतिम नाही, ही लढाई…”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेचं गणितही सांगितलं

अजित पवारांच्या ब्रँड व्हॅल्यूबाबत भाजपाला माहीत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकात रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखात अजित पवारांवर भाष्य केले होते. अजित पवारांमुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाबाबत शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजपाला जो काही अनुभव आला, तो त्यांनी सांगितला. आम्ही त्यात काही बोलू इच्छित नाही.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

“महाविकास आघाडीला महाराष्ट्रत मोठं यश मिळालं. या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. त्यामुळे या सर्वांचे आभार आम्ही मानतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठा पाठिंबा दिला. भाजपाला शेतकऱ्यांनी चांगला धडा शिकवला. काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. मात्र, धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहोत”, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.