Sharad Pawar offer prayers at Lalbaugcha Raja Ganesh pandal in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (सोमवार, ९ सप्टेंबर) लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. पवार हे त्यांचे जावई सदानंद सुळे (खासदार सुप्रिया सुळे यांचे पती) व नात रेवती सुळे यांना बरोबर घेत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. अनेक वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दरम्यान, यावेळी लालबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, शरद पवार लालाबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यामुळे महायुतीतले नेते त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. यावरून, शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भाजपा आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासामुळे थेट विदेश गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. ४० वर्षांत पहिल्यांदा असे घडले. याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात.

सध्या देशभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सामान्य नागरिकांसह अभिनेते, नेते व कलाकारांच्या घरीदेखील लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनाला भाविक गर्दी करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला महाराष्ट्रासह देश-विदेशातून भाविक येत असतात. यामध्ये कलाकार, नेते आणि सेलिब्रेटिंचाही समावेश असतो. अशातच आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मात्र, पवार यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर टीका करू लागली आहे.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : “..तर अजित पवारांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवारांना देऊन टाकावं”, जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांनी बाप्पाकडे काय मागितलं?

लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. यासह कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुंबईच्या गणेशोत्सवाचं वैभव गिरणगावात पाहायला मिळतं. आज कुटुंबीयांसह इथल्या लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं. बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली.