१० रुपयात मिळणाऱ्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ २६ जानेवारीपासून

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठकीत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन पोळ्या, एक वाटी भाजी,  एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयात देण्यात येईल. या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करुन वाजवी दरात आवश्यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करुन देणार आहे. सार्वजनिक वितरणासाठी आवश्यक असलेली साठवणूक क्षमता आधुनिक व सक्षम करणार आहे. प्रत्येक शिधापत्रिकेत, महिला सक्षमीकरणासाठी शिधापत्रिका कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याची निवड करणार आहे.

NFSA मध्ये अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांना प्रति महिना ३५ किलो धान्य आणि पीएचएच / एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलो प्रति व्यक्ती धान्य दिले जात आहे. तसंच शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे, विद्यार्थी वसतिगृहे,आश्रम शाळा, बालगृहे आणि कल्याणकारी संस्था यांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा केला जाईल. हे उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनामार्फत केली जाईल.

रास्त भाव धान्य दुकानदारांचे सक्षमीकरण, संगणीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्थेद्वारे केरोसीन वितरण, सुधारीत धान्य वितरण प्रणाली, पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT), कल्याणकारी संस्था व वसतीगृह योजना, गोदाम व्यवस्थापन, तांदूळ फोर्टीफीकेशन, शिवभोजन योजनेच्या तयारीचा आढावा, भविष्यातील विभागाची वाटचाल, वैधमापन शास्त्र विभाग व ग्राहक संरक्षण विभागाची माहिती, विभागातील रिक्त पदांचा आढावा  छगन भुजबळ यांनी सादरीकरणातून घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv bhojan yojna will start from 26th january says chaggan bhujbal scj

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या