लोकसभा निवडणुकीत राज्यात निर्विवाद यश मिळविणाऱ्या भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेतल्यास २२८ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त ५५ मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे.

राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचा जेमतेम एका मतदारसंघात उमेदवार निवडून आला. एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका मतदारसंघांमध्ये विजयी झाले आहेत.

लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून युतीने २२८ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या आणि २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. पण पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. स्वतंत्रपणे लढूनही भाजप आणि शिवसेनेचे १८५ आमदार निवडून आले होते. युती असती तर २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले असते, असे युतीच्या नेत्यांनी नंतर मान्य केले होते.

यंदा युती करण्याचे संकेत भाजप आणि शिवसेनेने दिले आहेत. युती कायम राहिली आणि बंडखोरी न झाल्यास युतीला चांगले यश मिळू शकते हेच लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट होते. अर्थात, विधानसभेच्या वेळी स्थानिक मुद्देही महत्त्वाचे असतात.

लोकसभा निवडणुकीत काही दिग्गज नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा पक्ष मागे पडला आहे. हा या नेत्यांसाठी धोक्याचा इशारा मानला जातो. यामध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने राज्यात चांगली मते घेतली असली तरी एकाही विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले, पण त्यांना एकही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेता आलेली नाही. अकोल्यातील बाळापूरमध्ये या पक्षाचा आमदार असला तरी तेथेही वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर आहे.

या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये पिछाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस सचिव अमित देशमुख, प्रणिती शिंदे, भास्कर जाधव, माजी मंत्री नसिम खान व मनोहर नाईक, स्वत: उमेदवार असलेले राष्ट्रवादीचे राणा जगतसिंह पाटील आणि संग्राम जगताप यांच्या मतदारसंघात पिछाडी आहे.