शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“आज शिवसेनेला ५८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळा आनंद आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी न्याय हक्क मिळावा, नोकऱ्या मिळाव्या यासाठी लढा दिला. त्यानंतर पुढे शिवसेनेची भूमिका वाढत गेली. शिवसेना पूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. आज ठाणे, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढली आहे. आपण या निवडणुकीत शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत. ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आपण जिंकलं आहे. दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला. त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “भाजपा आणि मिंध्यांना माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर…”

“शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखलं. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता. हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली”, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढं म्हणाले, “शिवतीर्थावर भाषण करताना सर्व इंडिया आघाडीचे नेते होते. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, असं म्हणू शकले नाहीत. आजही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले नाही. मग तुमचं हिंदुत्व कसलं आहे? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. गर्व से कहो हम हिंदू है, ही गर्जना बाळासाहेबांनी देशात गाजवली. आता उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कुठं गेलं? त्यामुळे धनुष्यबाण पेलण्याची ताकद आपल्यात आहे. आज आपण लोकसभेच्या ७ जागा जिंकलो. आता महायुतीमध्ये माझी जबाबदारी जास्त आहे. ती जबाबदारी सर्वांच्या साक्षीने पार पाडणार आहे. या सर्व वावटाळीमध्ये शिवसेनेचा मूळ आधार आहे तो मतदार दुसरीकडे गेला नाही. तो मतदार आपल्याकडेच आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.