Shivsena vs Shivsena Supreme Court Fight: शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह कोणाला बहाल केले जाणार यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात २०२२ साली सत्ताबदल झाल्यापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज (८ ऑक्टोबर) यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा असताना आता सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. सुनावणी पुढे ढकलल्यानंतर वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकीपूर्वी पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी केली जावी, अशी हस्तक्षेप याचिका शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. शिवसेनेची (ठाकरे) बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर प्रकरण आज सुनावणीसाठी आले. मात्र सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला येणार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली की, आज सुनावणी शक्य नसेल तर पुढील तारीख देण्यात यावी. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबरची तारीख दिली.
असीम सरोदे काय म्हणाले?
पुढील तारीख देण्यासंदर्भात असीम सरोदे म्हणाले की, प्रतिपक्षाच्या वकिलांनी आज युक्तीवाद पूर्ण होणार नाही, असे सांगितले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयासमोर इतर महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे अर्धवट सुनावणी ठेवण्यापेक्षा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र ४५ मिनिटांत त्यांचा युक्तिवाद संपेल, असे न्यायालयासमोर सांगितले होते.
१२ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाचा युक्तीवाद सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल पहिल्यांदा युक्तिवाद करतील. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वकील बाजू मांडतील. १२ ते १४ नोव्हेंबर असे तीन दिवस युक्तीवाद होऊ शकतो, अशी शक्यताही असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
ज्यांची बाजू कमकुवत असते…
एकनाथ शिंदे यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी डिसेंबर महिन्यात सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. याबद्दल सरोदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर सरोदे यांनी म्हटले की, ज्यांची बाजू कमजोर असते त्यांना काहीतरी न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात. संवैधानिक आणि कायद्याच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू अतिशय भक्कम आहे. त्यामुळे हे प्रकरण जेवढे पुढे ढकलता येईल, तेवढे ढकलावे, असा प्रयत्न प्रतिपक्षाचा दिसत आहे, अशीही प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी न्यायालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना दिली.