शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी आज (ता.२ एप्रिल) परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावार हल्लाबोल केला. परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सोमवारी (ता.१ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या सभेवर संजय जाधव यांनी टीका केली. शिंदे शिवसेनेच्या काही खासदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते. यावरून संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी परिस्थिती त्यांची झाली असल्याचा निशाणा साधला.
संजय जाधव काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे हे कसलेले पैलवान आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते वंशज आहेत. विरोधी पक्षाला कशी वागणूक द्यायची आणि कशी वागणूक घ्यायची, हे ते जाणतात. त्यांनी भाजपाला त्यांच्या काळात कधी लुडबुड करू दिली नाही. ज्यादिवशी असे वाटले, त्याच दिवशी ते बाहेर पडले. आता त्यांनी आम्हाला संपविण्याचा घाट घातला, पण आता तेच बेजार आहेत. चार पाच पक्ष गोळा करून सुद्धा भाजपाला निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, अशी अवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली”, असा हल्लाबोल संजय जाधव यांनी केला.
हेही वाचा : “संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली, आता…”, काँग्रेसमधील नेत्याचं मोठं विधान
“शिवसेना घेऊन गेले, पण ती टिकविण्याचे मोठे आव्हान शिंदे गटासमोर आहेत. ज्या परभणीने शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता दिली. त्या परभणीत ते उमेदवार सुद्धा देऊ शकले नाहीत. यापेक्षा काय दुर्भाग्य असू शकते. महाविकास आघाडी राज्यात भाजपापेक्षा जास्त जागा जिंकेल. निवडणुकांत मतलबी आरोप होत असतात. मात्र, मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर काही बोललो नाही. भाजपावर विश्वास ठेवून ते सोबत गेले आहेत, तो विश्वास किती सार्थकी ठरतो ते आपण पाहू. जे पेरले तेच उगवेल. तुम्ही का बाजूला गेला हे येणारा काळ ठरवेल. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि उद्यापण राहील. जे म्हणत होते की, मोदींच्या नावावर दगड सुद्धा तरेल. पण आज त्यांनी पाहावे, शिवसेनेचे चिन्ह गेले असले तरी मशाल चिन्हावर निवडणूक लढवत जिंकूनही दाखवू”, असे खासदार संजय जाधव म्हणाले.