Sanjay Raut on RSS and Kamaltai Gawai: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती येथे होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. संघाने त्यांना निमंत्रित केले होते. मात्र प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत असून विजयादशमीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलताईंनी स्पष्ट केले. यावर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाष्य केले असून माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना नागपूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, “संघाच्या संचालनात स्वयंसेवकाच्या हातात काठ्या असतात. काठीच्या माध्यमातून देशाचे संरक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, आम्हाला काठ्या नाही तर एके ४७ हवी आहे. तर आम्ही जम्मू-काश्मीरसह सर्व सीमांवर देशाच्या संरक्षणासाठी तयार राहू काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही.”
संजय राऊत म्हणाले, “संघाच्या हाती आज देशाची सत्ता आहे. त्यांनी पंतप्रधान आणि इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या संचलनाला सत्तेचे तेज आहे. संघाची शताब्दी झाल्यानिमित्त एक नाणे आणि पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. पण स्वातंत्र्य लढ्यात संघाचे नेमके काय कार्य होते? हे त्यांनी एकदा सांगितले पाहिजे.”
संघ हा विष आहे, आंबेडकरांचे विधान
“संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे. याबाबत आमच्या मनात शंका नाही. आमचीही कधीकाळी त्यांना सहानुभूती होती. जेव्हा जेव्हा राष्ट्र संकाटत असते तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांविषयी भूमिका घेतलेल्या नाहीत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे नाव संघाबरोबर जोडण्याच प्रयत्न केला जातो. पण गांधी किंवा डॉ. आंबेडकर यांनी कधीही संघाचे समर्थन केले नव्हते. संघ हा विष आहे, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते”, अशी आठवण संजय राऊत यांनी करून दिली.
कमलाताई या चंद्रचूड यांच्याप्रमाणे वागल्या नाहीत
आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या मेळाव्याला जबरदस्ती बोलविण्याचा घाट घालून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला. मी कमलाताई गवई आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करतो की, त्या संघाच्या जाळ्यात अडकल्या नाहीत. त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत, अशी टिप्पणी करताना संजय राऊत यांनी चंद्रचूड यांना टोला लगावला.