सोलापूर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सात रस्त्यावर झालेल्या या आंदोलनात गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि त्यांना महिला आघाडीने बागड्यांचा आहेर पाठवून संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांच्यामुळे पक्षांतर केले होते. या बंडास केवळ रश्मी ठाकरे कारणीभूत ठरल्याचा आरोप रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलन हाती घेतले आहे. सोलापूर शहर जिल्हा आणि महिला आघाडीच्या वतीने सात रस्ता भागात जिल्हाप्रमुख संतोष पाटील आणि महिला आघाडीच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धरणे आंदोलन केले. या वेळी गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच महिला आघाडीच्या वतीने गोगावले यांना बांगड्यांचा आहेरही पाठविण्यात आला. आंदोलनात रविकांत कांबळे, खंडू सलगर, शिवाजी माळी, इलियास शेख, संतोष घोडके, सत्तार शेख, कबीर शेख यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला वर्गाचा अवमान

मीनाताई ठाकरे यांच्या पश्चात रश्मी ठाकरे शिवसैनिकांच्या अस्मिता आहेत. मंत्री गोगावले यांनी त्यांचा केलेला अवमान हा समस्त महिला वर्गाचा अवमान आहे. यापुढे गोगावले यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यास ते दिसतील त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी दिला आहे.