कराड :  छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी, त्यांच्या खऱ्या इतिहासाला डावलण्याचे काम काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केल्याची घणाघाती टीका सार्वजनिक बांधकाममंत्री आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे बोलताना केली. ही नीती काँग्रेस पक्षाचे एक षडयंत्र आहे. याउलट नरेंद्र मोदी यांनी मात्र पंतप्रधान झाल्यापासून शिवरायांच्या कार्याला, विचाराला महत्व  दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

कराड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील आदी यावेळी उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजेंच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नव्या वादाला तोंड फुटले असून, त्याला काँग्रेस नेते आता काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की काँग्रेस पक्ष राजकीय स्वार्थासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करतो आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांना जातीयवादी म्हणतो. त्यांचा हा खोटारडेपणा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावत हा आणि त्याचे समविचारी पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात.

महाराष्ट्राचीच नाहीतर संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच सर्वाधिक बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कार्याकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. त्यांचा इतिहास, पाऊलखुणा, गडकिल्ले या साऱ्यांकडे या पक्षाने मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला महाराजांची उपेक्षा करायची आणि दुसरीकडे त्यांची बदनामी करत रहायचे हे एक मोठे षडयंत्र आहे. आमचा इतिहास, अस्मिता बदलण्याचा, पुसण्याचा हा डाव आहे.  महाराष्ट्रातील जनतेने याबाबत वेळीच सावध होत या अशा विचारांना थारा देऊ नये.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची कायम दखल घेतली. त्यांचा इतिहास, त्यातील घटनांची राष्ट्राशी जोडणी केली. आजवर दुर्लक्षित महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या जतनासाठी त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत.

अशी कृती काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीही झालेली नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ बदनामी आणि जातीजातींमध्ये भांडणे लावण्यासाठी केला अशी खरमरीत टीकास्त्र शिवेंद्रसिंहराजे यांनी या वेळी सोडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शिवेंद्रसिंहराजेंच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नव्या वादाला तोंड फुटले असून, त्याला काँग्रेस नेते आता काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.