आज राज्यभरामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. असं असतानाच राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याला विरोध केलाय. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये दुमत असल्याचं स्पष्ट होत आहे.

“१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासहीत जगभरामध्ये साजरी झाली. संभाजीराजे तसेच शाहू महाराजांच्या वंशजांनीही शुभेच्छा १९ तारखेलाच दिल्या. महात्मा फुलेंनी याच तारखेला शिवजयंती साजरी केली. २००० साली महाराष्ट्र शासनाने अधिकृत तारीख घोषित केली ती पण हीच आहे,” असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. “तिथीच्या नावाखाली वाद उकरुन काढायचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजेत अशी तरुणींची इच्छा आहे,” असा टोला मिटकरींनी शिवसेनेचा थेट उल्लेख न करता लागावलाय.

“तिथी आणि तारखांच्या बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज विश्वव्यापक कसे आहेत हे दाखवण्याची गरज आहे. तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करुन जी राजमुद्रेमध्ये म्हटल्याप्रमाणे विश्वव्यापक संकल्पना आहे ती संकुचित करण्याचं काम करत आहेत,” असंही मिटकरी म्हणाले आहेत. “या मागे केवळ राजकारण आहे. महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी झालीय. तिथीवरुन राजकारण करुन परत त्या वादात तरुणांना अडकवायचं,” असं मिटकरी म्हणालेत.

नक्की वाचा >> शिवजंयती वाद : मनसेच्या नेत्याने मिटकरींची अक्कल काढली; संतापलेल्या मिटकरींनी….

“बाबासाहेब अंबेडकरांची जयंती १४ एप्रिलला साजरी होते, महात्मा गांधीची जयंती २ ऑक्टोबरला साजरी होते, राजमाता जिजाऊसाहेबांची जयंती १२ जानेवारीला साजरी होते. पंडित जवाहरलाल नेहरुंची जयंती १४ नोव्हेंबरला साजरी होते. छत्रपती संभाजी राजेंची जयंती १४ मे रोजी साजरी होते, फक्त शिवाजी महाराजांबद्दलच हा वाद का?”, असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय. “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि २०२४ च्या निवडणुका लक्षात घेत काही पक्ष पुन्हा शिवाजी महाराजांचा तिथीमध्ये अडकवण्याचं काम करत आहेत. तरुण सावध आहेत. शिवजयंती (१९ फेब्रुवारीलाच) संपलेली आहे. आता फक्त काहीतरी कारणाने त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्या नावाखाली मतांची दुकानदारी चालावायची. यापलीकडे आजच्या शिवजयंतीमध्ये आयोजिकांनी दुसरा काही उद्देश ठेवला असेल असं मला वाटत नाही,” असं रोकठोक मत मटकरींनी व्यक्त केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याचा अट्टाहास आता कालबहाय्य झालेला आहे. एका काळात तिथी आणि तारखेत वाद व्हायचे. तीन तीन जयंत्या साजऱ्या व्हायच्या. शिवाजी महाराजांना मानता ना? शिवाजी महाराज एकच आहेत तर त्यांची जयंती एकच झाली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने १९ फेब्रुवारीची तारीख निश्चित केलीय त्यानुसार शिवजयंती साजरी झाली. मात्र आता तिथीनुसार शिवजयंती साजरी करुन मतांच्या दुकानदारीचं नवीन फॅड त्यांनी पुढं आणलंय, असं मला वाटतं,” असंही मटकरींनी सांगितलं आहे.