विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेतील ५३ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवांनी नोटीस पाठवली असून यामधून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावं लागणार आहे. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव का नाही?

राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केलं जात आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं नसल्याची टीका केली. यावेळी त्यांना नोटीसमध्ये त्यांचा उल्लेख नसल्यासंबंधी विचारलं असता म्हणाले की, “माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचं कारण नव्हतं”. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे असंही ते म्हणाले.

‘आरे’वरुन टीका

“महाविकास आघाडीचं सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार कऱणारं होतं. आम्ही ८०८ एकर जंगल घोषित केलं होतं. हे करत असताना आदिवासींचे हक्क बाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते,” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

“आधीचं प्लानिंग देखील चुकीचं होतं. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला द्या असं सरकार केंद्राला सांगत आहे. मेट्रो ६ सोबत अनेक मेट्रो लाईन कारशेडविना बांधायला घेतल्या होत्या. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणं आहे,” असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा अशी टीकाही त्यांनी केली.

“मुंबईने नेहमीच शिवसेनाला साथ दिली आहे. आरेवरील, मुंबईवरील आमचं प्रेम यावर राग ठेवूनच हा निर्णय घेतलाय का हा प्रश्न आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“हे सरकार स्थगिती सरकार होणार का? स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होणार आहे याबद्दल विचार करावा लागेल. सरकार बदललं म्हणून स्थगिती देणं हे योग्य नाही,” असंही ते म्हणाले.

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस; आदित्य ठाकरेंचे नाव वगळले

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना “बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही”, असं सांगितलं होतं.