मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार असून यावेळी ते काय बोलतात याची सध्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेआधीच शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. तसंच सभेसाठी पैसे देऊन लोकांना बोलावलं जात आहे असा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेआधी पदाधिकाऱ्यांना नोटीस; पक्ष म्हणाला “आम्हाला धमक्या देण्यापेक्षा…”

“औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेचं पानिपत करण्याची हिंमत कोणामध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

मनसेच्या सभेवर टीका करताना ते म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपा मदत करत आहे. या सभेसाठी नागरिकांना पैसे देऊन सभा ऐकण्यासाठी बोलवण्यात येत आहे”.

हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रत्युत्तर; म्हणाले “शोलेमधल्या आसरानीसारखे…”

“राज ठाकरे यांच्या सभेला कितीही नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील,” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

राज ठाकरे यांची सुपारी सभा – सुभाष देसाई

सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे म्हटलं होतं. बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही”.

“अगोदर शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. राज्यात लवकरच मनसे आणि भाजपाची युती पाहण्यास मिळेल. भाजपाने मनसेला सुपारी देऊन ही सभा आयोजित केली आहे. मात्र अशा सुपारी सभेचा शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही, औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही,” असं सुभाष देसाई म्हणाले.

..तर सभा उधळून लावू, भीम आर्मीचा इशारा

पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या १६ अटींचं उल्लंघन राज ठाकरेंनी केलं तर सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. आज राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार असून राज ठाकरेंना भारतीय संविधान भेट देणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena chandrkant khaire on mns raj thackeray aurangabad rally sgy
First published on: 01-05-2022 at 12:23 IST