गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत याकूब मेमनच्या कबरीवरून जोरदार राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यावरून शिवसेनेकडून जोरदार प्रत्यु्त्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता याकूब मेमनचा नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनला कोण कोण भेटलं? यावरून देखील राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात भाजपानं एक व्हिडीओ जारी केला असून यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी रऊफ मेमनसोबत बैठक घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, यावर आता किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचे रऊफ मेमनसोबतचे फोटो त्यांनी माध्यमांना दाखवले आहेत.

काय आहे ‘त्या’ व्हिडीओमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये किशोरी पेडणेकर आणि रउफ मेमन हे एका बैठकीत असल्याचं दिसत आहे. ही बैठक बडा कब्रिस्तानमध्ये झाली असून तिथे २० ते २५ लोक हजर होते, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमनचे देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे फोटो देखील प्रसारमाध्यमांना दाखवले.

“मला वाटतं की हे फार चुकीचं आहे. ज्याच्याशी उद्धव ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही, तिथे संबंध जोडत आहेत”, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस आणि राज्यपालांचे रऊफ मेमनसोबतचे फोटो दाखवले. “याला काय म्हणायचं? याला उत्तर द्या. राज्यपाल देखील स्वत: त्यांच्यासोबत आहेत. ही १२ तोंडं बोलतायत. फक्त आरोप करण्यासाठी भाजपानं बसवली आहेत. त्यांनी उत्तर द्यावं. एका मध्यमवर्गीय महिलेलाही तुम्ही नाही सोडत. मी कामाने मोठी झाले. मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही. मला माहिती नाही ते. माझ्या कामावर आक्षेप असेल तर मला सांगा. हे फोटो तर कुणीही काढतं”, असं त्या म्हणाल्या.

‘त्या’ व्हिडीओमागचं सत्य काय? पेडणेकर म्हणतात…

“ही १२ तोंडं आता उठून बोलतायत. मी कधीही इतक्या मोठ्या राजकारणात गेली नाही. मी कब्रिस्तानाला भेट दिली नव्हती. मी सगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. त्यात हेही एक धार्मिक स्थळ होतं. राज पुरोहिताचा मुलगा आकाश पुरोहित हा देखील होता. तिथल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करायला आम्ही गेलो होतो. राज्यपाल देखील रऊफ मेमनला भेटले. याला काय म्हणणार? देवेंद्र फडणवीसही त्यांना भेटले. त्याला काय म्हणणार? जे बदनामीचं षडयंत्र तुम्ही करत आहात, त्या चिखलात तुम्हीच पडणार आहात”, असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एका स्त्रीवर तुम्ही आक्षेप घेता. राजकारणातल्या स्त्रियाही तुम्ही नाही सोडणार. सत्ता मिळवा, पण काम करून मिळवा. तुमची विश्वासार्हता टिकवून मिळवा जी शिवसेनेनं अनेक वर्षांपासून मिळवली आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतोय असं तुम्ही सांगताय. हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार हे मुंबईकरांना कळतायत. फक्त मुंबई महानगर पालिका मिळवायचीये आणि नागपूर महापालिकेसारखीच मुंबईची अवस्था करून ठेवायचीये. पण हे मुंबईकर होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे”, असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.