Aaditya Thackeray on Maharashtra Medical Device Park : कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारा वेदांन्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं होतं. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील एक लाख रोजगार बुडाल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला होता. यानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. त्यांनी एक ट्वीट करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- Medicine Devices Park : आदित्य ठाकरेंच्या आरोपावर फडणवीसांकडून प्रत्युत्तर ; म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की…”

आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, वेदान्त-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेलाही मुकावं लागलं आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

हेही वाचा- “शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच वडगाव-मावळ परिसरात जनआक्रोश मोर्चा काढला होता. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने लाखभर लोकांचा रोजगारही गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. वेदान्त प्रकल्प गुजरातला गेल्याची घटना ताजी असताना आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.