वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तर, विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पांपाठोपाठ महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्कला देखील मुकावे लागल्याचं सांगत, राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“वेदान्त-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट शेअर करत केला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की, ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा तरी ते पुरावा दाखवू शकतात का? उगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं, ते अडीच वर्ष सत्तेत होते. मात्र अडीच वर्षांत काहीच केलं नाही. केवळ केंद्र सरकारला शिव्या देण्याचं काम केलं आणि आता मनात येईल ते बोलत आहेत. माझा त्यांना एक सवाल आहे, किमान एक चिठ्ठी तरी दाखवा की ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ महाराष्ट्रासाठी मंजूर झाला होता आणि मग तो दुसरीकडे गेला. रोज खोटं बोलायचं, रेटून बोलायचं याने महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही. आम्ही हिंमतीने महाराष्ट्रात गुंतवणूक आणली, यापुढेही आणून दाखवू.”

तर “खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

हेही वाचा : पालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

तसेच, “गुजरातबद्दल मला वाईट बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. आपल्या राज्यात खोके सरकार असताना त्यांनी मौक्यावर चौका मारला आणि आपल्याकडे येणारा उद्योग त्यांच्या राज्यात नेला. मी गुजरात सरकारला याचा दोष देणार नाही. आपल्याच सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे” , अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी वेदान्त-फॉक्सकॉन संदर्भात बोलताना केली आहे.