शिवसेना पक्षात फूट पडून दोन गट तयार झाल्यापासून खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न सर्वांना पडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न चर्चेत होता. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचं उत्तर दिलं आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट करत राहुल नार्वेकर म्हणाले, शिवसेनेची घटना सांगते की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची? याचा निर्णय आम्ही घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सर्व पुरावे आणि आमदारांच्या साक्षी तपासून मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, अशी मान्यता देतो.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं आधी वाचन केलं. नार्वेकर म्हणाले, दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे. दोन्ही गटांमध्ये खरे पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची जी घटना दिली त्यावर कोणतीही तारीख नव्हती. त्यामुळे मी शिवसेनेची १९९९ ची घटना मान्य केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत, त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने भारत गोगावले यांच्या व्हीपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाचे प्रतोद कोण याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर नार्वेकर यांनी आज उत्तर दिलं. नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांची पक्षाच्या प्रतोदपदी झालेली निवड ही वैध आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू यांना (ठाकरे गटाचे प्रतोद) आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांच्या बैठकीला आमदार गैरहजर होते हा मुद्दा विचारात घेतला जाणार नाही. शिंदे गटातील आमदारांना तो व्हीप मिळाला नव्हता असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता. त्यामुळे तो व्हीप सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे ठाकरे गटाकडे किंवा प्रभू यांच्याकडे नाहीत.

हे ही वाचा >> “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!” उद्धव ठाकरेंना झटका, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे १९९९ मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध मानता येईल. पण २०१८ मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं. हा निर्णय कार्यकारिणीने घ्यायचा असतो. उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही ते म्हणाले.