मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात प्रतिष्ठेशी ठरलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे गट सरशी ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे. उद्धव ठाकरे विनम्रपणे सांगते होते, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी क्षणोक्षणी दिसत होता. आमच्या परंपरेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे.”

हेही वाचा – शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

संकुचित, कपटी वृत्तीची ही माणसे

“सत्य नाकारता येत नाही. सुर्य झाकता येत नाही. मांजरांनी आडवे जाण्याचा प्रयत्न केला. अश्लाघ्य भाषेत शिवसेनेवर टीका करण्यात आली. ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा देणारी गोष्ट होती. बीकेसी मैदानात शिंदे गटाला परवानगी मिळाली होती. त्यांनी मन मोठे करून तुम्ही शिवाजी पार्कवर सभा घ्या आम्ही बीकेसी मैदानात घेतो, असं म्हटलं पाहजे होते. मात्र, संकुचित, कपटी वृत्तीची ही माणसे आहेत. गटप्रमुखांच्या मेळ्याव्यात मुंगीला जायला जागा नव्हती. आता दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या गर्दीचा रेकॉर्ड मोडला जाईल,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.