महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर आता व्हिडीओच्या माध्यमातून उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उदय सामंत यांचा एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. “मला एक संभ्रम दूर करायचा आहे. मी शिवसेनेतच आहे. पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे. त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. मला पदाधिकाऱ्याना आवाहन करायचे आहे की कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका. मी शिवसेनेत आहे. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

“राज्यसभा निवडणुकीसाठी आपण संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत म्हणून तिकीट देणार होतो. पण आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिले. त्यानंतर या शिवसैनिकाला राज्यसभेत जाता येणार नाही यासाठी घटक पक्षांनी योग्य बंदोबस्त केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत आहेत. घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जी मोहिम आखली आहे त्यात मी सहभागी झालो आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. मी शिवसेनेत आहे त्याचाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे,” असेही उदय सामंत म्हणाले.

यासोबत उदय सामंत यांचा आणखी एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांनी ट्विटवर पोस्ट केला आहे. सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते असलेल्या उदय सामंत यांनी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याने शंका उपस्थित झाली होती. मात्र आता ते गुवाहाटीला पोहचल्याने खळबळ उडाली होती.