शिवसेना खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत असून ते अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन विरोधक टोला लगावत असताना संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. मात्र उत्तर देताना त्यांची जिभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”.

संजय राऊतांचे UPA मध्ये सहभागी होण्याचे संकेत, राहुल गांधींना दिला सल्ला; म्हणाले “मी उद्धव ठाकरेंसोबत…”

पुढे ते म्हणाले की, “त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव असे जरी कोणी नेते आले असते आणि जर त्यांनाही असा त्रास असता तर नक्की मी त्यांना स्वत: ही खूर्ची आणून दिली असती. कारण राजकारणात जरी मतभेद असले तरी ते पितृतूल्य लोकं आहेत”.

“कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“बिपिन रावत यांच्या जाण्याने सरकार सुद्धा गोंधळलेले आहे”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

दरम्यान भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना…ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील”.

“शरद पवार किंवा त्यांच्या वयाचे, उंचीचे नेते या देशात आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देणं यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास आहे, शारिरीक वेदना आहेत त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे,” असंही ते म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांच्या भेटींवरुन भाजपा नेते करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असं सांगेन”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on viral photo with ncp sharad pawar sgy
First published on: 09-12-2021 at 10:33 IST