रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले असून चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी घातपाताची शक्यता असल्याची चर्चा चालू असतानाच आता मंत्री रामदास कदम यांनी स्वत: यासंदर्भात थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला आहे. याबाबत सखोल तपासाची मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

नेमकं काय झालं?

योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री गंभीर अपघात झाला. मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळ गाडी मुंबईच्या दिशेने येताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये योगेश कदम बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, त्यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी आपण सुखरुप असल्याचं सांगितलं आहे.

VIDEO: अपघातानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी मुंबईला जात असताना…”

दरम्यान, योगेश कदम यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना व्यक्त केला आहे. “हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे असा मला दाट संशय आहे. याबाबत मी पोलिसांशी बोललोय. यासंदर्भात कसून चौकशी करण्याबाबत त्यांना सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही मी याबाबत आज रात्री बोलणार आहे”, असं रामदास कदम म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनिल परबच्या खांद्यावर बंदूक ठेवून…”

“योगेश कदम याला राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावर बंदूक ठेवून केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. म्हणूनच आता त्याला जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केला की काय, असा मला संशय आहे. म्हणूनच याची चौकशी होणं आवश्यक आहे”, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.