राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये आणि राष्ट्रवादीत सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सादर केलेल्या एका कवितेवरुन वाद सुरु झालाय. बुधवारी (११ मे) शरद पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला. या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती. भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय. “‘आम्ही पाथरवट…’ या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत. त्याचा कोणी गैरप्रचार करत असेल तर त्यांनी आवश्य करावा,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुरंदर येथे पत्रकारांशी बोलताना पवारांनी कविता वाचून दाखवल्यानंतर भाजपाकडून पुन्हा टीका केली जात असतानाच शिवसेनेनं शरद पवारांचं समर्थन करत भाजपावर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> “भाजपा आणि चंद्रकांत पाटीलांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी नाहीतर…”; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

ते हिंदू धर्माचे दुश्मन असे म्हणता येणार नाही
“मला शेंडी-जानव्याचे, फक्त घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नको असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत. त्यांचे हिंदुत्व विज्ञानवादी व पुरोगामी होते, पण आज राज्यात हिंदुत्वाचे जे ठेकेदार निर्माण झाले आहेत त्यांचे हिंदुत्व लोकांत दंगली आणि मनभेद करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माने हिंदूच होते. संत गाडगे महाराज हेसुद्धा जन्माने आणि कर्माने हिंदू होते, पण त्यांनी हिंदू धर्मातील रूढी, परंपरांवर टीका केली म्हणून ते हिंदू धर्माचे दुश्मन असे म्हणता येणार नाही,” असं शिवसेनेनं भाजपावर टीका करताना म्हटलंय.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणारी कविता
“भारतीय जनता पक्षाच्या व त्यांच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. शरद पवार यांनी साताऱ्यात एक भाषण केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या ‘सोशल मीडिया’वाल्यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. पवारांनी म्हणे हिंदू देवदेवतांचे बाप काढले. पवार नास्तिक आहेत व हिंदुद्वेष्टे आहेत. पवारांनी जवाहर राठोड या कवीची एक कविता काय वाचून दाखवली आणि भाजपाच्या लोकांच्या अंगावर जणू विंचवांची पिलावळच पडली. पवारांनी भाषणात सांगितले, शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना उपेक्षित समाजातील मुले उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड या दिवंगत कवीचे स्मरण त्यांनी केले व त्याची ‘पाथरवट’ कविता वाचून दाखवली. ‘पाथरवट’ कवितेत कवी म्हणतो, ‘‘आम्ही पाथरवट निर्माण करतोय चक्कीचे पाट, ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला, आम्ही मात्र अन्नाच्या कण्यासाठी रोज नुसती घरघर करतोय, दुसरं काय तर आमचं दुर्दैव, आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसलो जातोय. तुमच्या ब्रह्मा, विष्णू, महेशाला, लक्ष्मी अन् सरस्वतीला आम्हीच रुपडं दिलंय, आता तुम्ही खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता?’’ त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असे जवाहर राठोडने लिहून ठेवलं, असे पवारांनी सांगितले. जवाहरची कविता विद्रोही आहे, समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणारी आहे,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

गाडगेबाबांचा केला उल्लेख
“नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, राजा ढाले यांनी जी वाट कवितेत निर्माण केली त्याच वाटेने जाणारी ही जवाहरची ‘पाथरवट’ आहे. त्यातली एक बंडखोर कविता पवारांनी वाचून दाखवली. पवारांसारखे राजकारणी आजही वाचतात. भाजपावाल्यांना वाचनाचे वावडे आहे. ते वाचत नाहीत म्हणून वाचले नाहीत. त्यांच्या सांस्कृतिक गटांगळ्या सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा लढा काय होता? साने गुरुजीही काळाराम मंदिराच्या लढ्यात होते. संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचा झाडू महाराष्ट्रात फिरवला. गाडगेबाबांची कीर्तने ज्यांनी ऐकली त्यांना जवाहर राठोडचे दुःख कळेल. त्यांच्या कीर्तनात कर्मकांड नव्हते, पोथी नव्हती, पुराणे नव्हती, देवांची वर्णने नव्हती, मूर्तिपूजा तर नव्हतीच नव्हती. साऱ्या आयुष्यात ते कोणत्याही देवळात कधी गेले नाहीत किंवा कोणत्याही मूर्तीपुढे त्यांनी आपली मान तुकवली नाही,” असा उल्लेख लेखात आहे.

देशात वेगळ्या पद्धतीची तालिबानी व्यवस्था निर्माण करायचीय
“ब्रह्मदेवाच्या निरनिराळ्या अवयवांपासून चातुर्वर्ण्य निर्माण झाले या भोळसट कल्पनेवर जोतिबा फुले यांनी हल्ला केला. जिथे देवाचे स्वरूपच माणसाने ठरविले तिथे माणसाचे स्वरूप तुम्ही कोण ठरवणार? असा परखड सवाल जोतिबांनी विचारला. तेव्हा पुण्यातील कर्मठांनी जोतिबांना जगणे कठीण केले. याच हिंदुत्वाचा पुरस्कार आजचे भाजपावाले करू पाहत आहेत व त्यांना देशात वेगळ्या पद्धतीची तालिबानी व्यवस्था निर्माण करायची आहे. सामान्य माणसाला धर्माच्या उलटसुलट विचारांत अडकवायचे व पोटातली भूक विसरायला लावायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही
“देशाची मनःशांती बिघडविणारे धर्मांध राजकारण हे लोक करू पाहत आहेत. लेखक-कवींनी काय लिहायचे व कोणी काय वाचायचे यावर राजकीय सेन्सॉरशिप घातली जात असेल तर ‘पाथरवट’चा विद्रोह तीव्र करावा लागेल. देशाला एक हजार वर्षें मागे नेण्याचे धार्मिक प्रयोग म्हणजे हिंदुत्व असे ज्यांना वाटते त्यांच्या हाती १३० कोटींच्या देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

स्वातंत्र्यलढा व महाराष्ट्राचा लढा याच कष्टकरी लोकांमुळे जिंकलो
“ईश्वराला बाप नसतो, असे नेहमीच सांगितले जाते. मुळात या सर्व कल्पनांची निर्मिती केली आहे ती माणसाने. आपल्या कल्पनाशक्तीनुसार माणसाने देवांना रूप दिले, त्यानुसार मूर्ती घडविल्या. मात्र ज्यांनी त्या घडविल्या त्यांनाच नंतर देवाचे दर्शन घेण्यास बंदी घातली. ‘पाथरवट’ या कवितेत जवाहर राठोड यांनी हीच वेदना व्यक्त केली आहे. ‘आम्ही देवांना रुपडं दिलं आहे, तेव्हा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच देवाचे पिता?’ असा प्रश्न कवीने केला आहे. त्यामागील भावना समजून न घेता ‘देवाचे बाप कोण?’ अशी आदळआपट सुरू आहे आणि साताऱ्यातील एका कार्यक्रमात ती कविता वाचून दाखविणाऱ्या शरद पवारांवर टीका केली जात आहे. ही कविता म्हणजे कष्टकऱ्यांची व्यथा आहे. देशातील मजूर, शोषित, दीनदुबळ्यांच्या व्यथांचा आक्रोश आहे. भाजपाच्या हिंदुत्वात या पीडितांना स्थान नाही काय? स्वातंत्र्यलढा व महाराष्ट्राचा लढा याच कष्टकरी लोकांमुळे आम्ही जिंकलो हे कसे विसरता येईल?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.