गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींवर ईडी, सीबीआय आदी तपासयंत्रणांनी छापा टाकला. काहींना ताब्यात घेतले तर काहींना अटकही करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटाकडून प्रारंभीपासूनच यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले जात असताना आता ‘सामना’तील अग्रलेखातून ठाकरे गटानं नरेंद्र मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. तसेच, देशात हिटलरलाही लाज वाटेल अशा पद्धतीने अमानुष राजकीय हत्यासत्र चालू असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे.

“…तोपर्यंत देशाला भय नाही”

“देशाने १९७५ च्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी अनुभवली आहे. त्या काळ्याकुट्ट कालखंडास लाज वाटावी इतक्या बेगुमान पद्धतीने भाजपचे राज्यकर्ते आज वागत आहेत. गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांतील अनेकांवर ‘ईडी’ने छापे मारले व काहींना अटका केल्या, पण या अशा सर्व कारवायांपासून भाजपचे अतिप्रिय गौतमभाई अदानी सर्व करून सवरून मोकळे आहेत. त्यांना मोदी सरकारने सुरक्षेची विशेष कवचकुंडले बहाल केली आहेत”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“हसन मुश्रफ यांच्याबाबत कुणीतरी सुपारी…”

मनीष सिसोदिया, के. सी. आर. यांच्या कन्या, लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबीया यांच्यावरील कारवाईचा दाखला देतानाच अग्रलेखात हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचाही संदर्भ देण्यात आला आहे. “महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी गेल्या काही काळापासून ‘ईडी’चे धाडसत्र सुरू आहे. मुश्रीफ यांच्या पत्नी या प्रकारामुळे उद्विग्न झाल्या व म्हणाल्या, ‘‘एकदाच काय त्या आम्हाला गोळ्या घाला व मोकळे व्हा!’’ केंद्रीय यंत्रणा ज्या निर्घृण पद्धतीने काम करीत आहेत, त्याबाबतचा हा संताप आहे. मुश्रीफ यांच्याबाबत कोणीतरी सुपारी घेतल्याने त्यांच्यावर धाडी पडत आहेत. हे राजकीय सुडाच्या सुपारीचे प्रकरण आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून तपास यंत्रणांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

“आमदार राहुल कूल यांच्या दौंडमधील साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार”; संजय राऊतांचे गंभीर आरोप, फडणवीसांना लिहले पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीने कारवाया”

आता हिटलरप्रमाणे देशात विरोधकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारण्याचंच सरकारनं बाकी ठेवलं आहे, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. “मोदी सरकार व भाजप नेत्यांची कुटुंबे भ्रष्टाचाराच्या चिखलात संपूर्ण बरबटली आहेत. भाजपास हजारो कोटी रुपयांच्या देणग्या अज्ञात स्रोतांकडून मिळाल्या. त्याचे मायबाप हे भ्रष्टाचारी आहेत. पी. एम. केअर्स फंड म्हणजे सरकारी फसवणूकच आहे. त्याचे साधे ऑडिट करायला कोणी तयार नाही, पण राजकीय विरोधकांना, त्यांच्या कुटुंबांना छळले जात आहे. हिटलरला लाज वाटेल अशा पद्धतीचे राजकीय अमानुष हत्यासत्र सध्या सुरू आहे. हिटलरने ज्यूंना गॅस चेंबरमध्ये कोंडून मारले. आता आपल्या देशात राजकीय विरोधकांबाबत तेवढेच करायचे बाकी आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे”, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.