Shyam Manav on Devendra Fadnavis : अनिल देशमुख यांच्यावर ईडी आणि इतर यंत्रणाचा दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप श्याम मानव यांनी केला. या आरोपावर उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इकोसिस्टिममधील काही लोक सुपारी देत असल्याची टीका केली. फडणवीसांच्या टीकेला आता श्याम मानव यांनी उत्तर दिले आहे. “कुणीतरी मला सुपारी देईल आणि मी तसा वागेल, असे देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचे आहे का? त्यांनी ते जाहीरपणे सांगावे. खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त आहे. विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे. मला कुणी विकत घेऊ शकतं का? किंवा मी कुणाच्या सांगण्यावरून वागू शकतो का? माझे संपूर्ण ५४ वर्षांचे जीवन लोकांसमोर आहे”, असे प्रत्युत्तर श्याम मानव यांनी दिले.

श्याम मानव म्हणाले, “मी १९७० पासून सार्वजनिक जीवनात आहे. मी स्वतः पत्रकार म्हणून शोधपत्रकारिता केलेली आहे. या काळात हजारो लोकांचा भांडाफोड मी केलेला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे पुरावे दिल्यानंतर त्यावर कितपत विश्वास ठेवावा, कितपत ठेवू नये. कोणते पुरावे पाहावे, कोणते पाहू नयेत. या सर्व गोष्टी मला नीट माहीत आहेत. माझी विश्वसनीयता मला महत्त्वाची आहे. मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, बोलणार नाही. मी जे आरोप केले, ते आज पहिल्यांदा बोललो नाही. मी गेल्या पाच महिन्यांपासून हे बोलत आहे.”

हे वाचा >> Devendra Fadnavis : “अनिल देशमुखांच्या रेकॉर्डिंग माझ्या हाती, त्यांनी..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

माझ्या आरोपांवर मी ठाम आहे

अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबाबत बोलताना श्याम मानव म्हणाले की, अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची खात्री पटल्याशिवाय मी बोलणार नाही. सरकारवर एवढा गंभीर आरोप आपण करत आहोत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात? याची मला कल्पना आहे. मी फक्त लोकशाही, राज्यघटनेविषयी बोललो. अशा पद्धतीने सरकार पाडण्याला माझा विरोध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंगाधरपंत फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले?

माध्यमांशी बोलत असताना श्याम मानव यांनी यावेळी गंगाधरपंत फडणवीस यांचीही आठवण बोलून दाखवली. ते म्हणाले, “एकेकाळी आणीबाणीच्या विरोधात आंदोलनामुळे मी तुरुंगात गेलो, तेव्हा हेच संघाचे लोक माझ्याबरोबर होते. तुरुंगातून सुटल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याबरोबर काम केलेले आहे. कारण त्यांना माझे कौतुक वाटत होते.”

फडणवीस यांची भेट सोपी नाही

श्याम मानव यांनी एवढे मोठे आरोप करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करायला हवी होती, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर बोलताना श्याम मानव म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे सोपे नाही. मी तीन वर्षांपासून त्यांची भेट घेण्यासाठी तासनतास वाट पाहिली आहे. पण त्यांची भेट होऊ शकली नाही.