सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक एकोप्याला बळकटी देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची असलेली जुनी, जातीवाचक नावे आता बदलण्यात आली आहेत. यापुढे, या ठिकाणी महापुरुषांची गौरवशाली नावे किंवा लोकशाही मूल्यांशी निगडित नावे दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे ‘हरिजन वाडी’, ‘जाधव वाडी’, ‘चर्मकार वाडी’, ‘बौद्ध वाडी’ अशा प्रकारच्या जातीवाचक नावांनी रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणे कायमस्वरूपी थांबणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन पूर्ण
हा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी अनुसूचित जातीच्या शिष्ट मंडळाला जनता दरबारात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करणारा आहे. जुलै महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात’ ही सामूहिक मागणी पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आली होती. त्यावेळी, पालकमंत्री राणे यांनी प्रशासनाला हे काम ‘युद्धपातळीवर’ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते आणि सातत्याने आढावा घेतला होता.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची किंवा लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा आदेश यापूर्वीच निर्गमित केला आहे. या अनुषंगाने, ‘जातिवाचक वाडी/वस्त्यांची नावे बदलणे’ या समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने जातीवाचक नावे बदलण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
या निर्णयाच्या प्रक्रियेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ जातीवाचक वस्त्यांची व २५ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात आले. हे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले. शासन निर्णयानुसार, जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने, प्राप्त अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभांनी प्रस्तावित केलेली नवीन नावे देण्याचे आदेश जारी केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक सलोख्यासाठी आणि समानतेच्या तत्त्वांना अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.