सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा दुर्घटनाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याचा न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यापूर्वी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याचाही जामीन अर्ज नामंजूर केला होता. आपल्याला जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना काळजी घेतली पाहिजे होती, ती काळजी घेतली नाही, असा सविस्तर युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या कामी सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. पुतळा दि. २६ ऑगस्ट रोजी कोसळला. अवघ्या आठ महिन्यांत पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या दरम्यान मालवण पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यांनी पुतळा शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटक करून चौकशी केली. त्यानंतर आपटे आणि पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोघांनीही न्यायालयात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.