सावंतवाडी: जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ‘प्लॅस्टिकचा वापर शून्य करूया’ असे आवाहन केले आहे. आचरा येथे आयोजित या अभियानात त्यांनी स्वतः सहभाग घेत परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

​आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक पिशव्या आणि बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणावर त्याचा भार वाढत आहे. हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेषतः मालवण आणि इतर किनारी भागात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढतो. त्यामुळे या भागांत जनजागृती करणे आवश्यक आहे.

​प्रशासन स्तरावर प्लॅस्टिक कचरामुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत सहभागी होत त्यांनी प्लॅस्टिक पिशव्या आणि बाटल्या उचलून स्वच्छता केली.

​’वाढती प्लॅस्टिक कचरा समस्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे’ यावर जोर देत त्यांनी परिसर स्वच्छतेबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. पर्यटनाच्या हंगामात ग्रामपंचायतींवरील कचरा व्यवस्थापनाचा ताण वाढतो. त्यासाठी योग्य नियोजन आणि उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

​या कार्यक्रमाला मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, तसेच विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.