सावंतवाडी: बिबट्याचे दात आणि नखे (अवयव) विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका टोळीला सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने सापळा रचून तोतया ग्राहक पाठवून कणकवली येथे रंगेहाथ पकडले.

या कारवाईत टोळीकडून बिबट्याची १२ नखे आणि ४ दात तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.​ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कणकवली – डामरे परिसरात करण्यात आली. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या चारही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

​कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना काहीजण बिबट्याचे नखे आणि दात विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पाटील यांनी एका कर्मचाऱ्याला तोतया ग्राहक बनवून कणकवली-डामरे येथे नखे व दात खरेदी करण्यासाठी पाठवले. त्याचवेळी वनविभागाच्या पथकाने टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला. तोतया ग्राहक त्यांच्याकडून दात व नखे खरेदीचा व्यवहार करत असतानाच, पथकाने चौघांना घटनास्थळीच रंगेहाथ पकडले.

​संशयित आरोपींची नावे:

  • ​विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली)
  • ​कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)
  • ​तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, जि. बेळगाव)
  • ​परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव)

​या आरोपींकडून बिबट्याची १२ नखे, ४ दात आणि तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

संशयित आरोपींच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद आणि उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे असे वन विभागाच्या पथकाने सांगितले.