सावंतवाडी : पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः या परतीच्या पावसाने भात आणि नाचणी पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

एका बाजूला पावसाने रडविले आहे, तर दुसरीकडे मडुरा परिसरात हत्तीच्या वावरामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने “पावसाने रडविले, हत्तीने चिरडले” अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

​सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक कुजून गेले आहे. कापणी करून वाळत घातलेल्या भातालाही कोंब फुटू लागले आहेत, तर काही ठिकाणी वाफ्यांमध्ये वाळत घातलेली धानाची पेंडी पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे. याशिवाय उभ्या असलेल्या भाताच्या ओंब्यांनाही कोंब येऊ लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

​’उंबराठा’ नियमामुळे विमा भरपाई अडचणीत

​शासनाच्या आदेशानुसार अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन भात आणि नाचणी पिकाचा विमा भरलेला आहे. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार पीक विम्याची भरपाई ‘उंबराठा’ पिकावर अवलंबून असल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकणार नाहीत, असे विमा प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.

​कोकण विभागात भात कापणीच्या वेळी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे भात आणि नाचणी पिकाचे नुकसान होते. मात्र, ‘उंबराठा’ पीक सर्व शेतकऱ्यांमध्ये एक समान मिळत नाही. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी विभाग आणि महसूल विभाग शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. पीक स्पर्धेत सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील उत्पन्नाच्या आधारावर ‘उंबराठा’ उत्पन्न ठरवले जाते आणि हेच उत्पन्न सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पिकेल असा अंदाज लावून हा नियम लागू केला जातो.

पश्चिम महाराष्ट्राच्या निकषांवर आधारित असलेल्या या नियमांमुळे कोकणातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रकारचे निकष कायम राहिल्यास भविष्यात शेतकरी वर्ग कृषी आणि महसूल विभागाला सहकार्य करणार नाही, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

​शेतकऱ्यांची मागणी

सावंतवाडी तालुक्यातील ​नेमळे गावातील शेतकरी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करणार आहेत. त्यांची मुख्य मागणी अशी आहे की, ‘उंबराठा’ पिकाचा शासन निर्णय रद्द करून प्रधानमंत्री पीक विम्यात सहभागी असलेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

​शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

​शेतकरी सुनील राऊळ म्हणाले की, “हंगामपूर्व आणि हंगामानंतर झालेल्या पावसामुळे शेतकरी व बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. नेमळे गावातील शेतकरी लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.”

​पाडलोस विकास सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ नाईक म्हणाले की, “पूर्वी कास, मडुरा, रोणापाल भागात वन्य प्राण्यांचा वावर असायचा, पण यावर्षी ओंकार हत्तीचा वावर वाढल्यामुळे भातशेती व बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाने रडविले तर हत्तीने चिरडले असेच शेतकऱ्यांच्या बांधावर घडत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.”

​आरोग्यावर परिणाम

​परतीच्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना सर्दी, खोकला, ताप अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे.