सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. विशेषतः सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली नाही, त्यामुळे सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

१८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८६.३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस कणकवली (१७२ मिमी) आणि वैभववाडी (१०७ मिमी) येथे झाला. त्याखालोखाल सावंतवाडी (१०५ मिमी), देवगड (१०० मिमी), वेंगुर्ला (४९ मिमी), मालवण (३३ मिमी), कुडाळ (८२ मिमी) आणि दोडामार्ग (४३ मिमी) अशी पावसाची नोंद झाली आहे.

​वाहतूक व्यवस्थेवर परिणाम :

  • मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली.
  • कणकवली-आचरा रोड : उर्सुला येथे पाणी भरल्याने वाहतूक बिडवाडी मार्गे वळवण्यात आली आहे.​ शिवडाव-परबवाडी : येथे पाणी साचल्यामुळे कळसुली झोपडी मार्गे वाहतूक सुरू आहे.​ आजगनी रोड : सातरल-कासरल येथे पाणी भरल्याने वाहतूक तातरभाव मार्गे वळवण्यात आली आहे.
  • भिरवंडे – रामेश्वर मंदिरापुढील मोरीवर पाणी आल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.​कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील दुकानवाड आणि निवजे येथील पुलांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुकानवाड पुलावरील वाहतूक बंद असल्याने बसगाड्या पुलाच्या अलीकडील थांब्यापर्यंतच येत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

​वैभववाडी-सडूरे शिराळे मार्गावर दरड कोसळली :

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी-सडूरे शिराळे मार्गावर सडूरे दौंडोबा येथे दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु शिराळे-विजयदुर्ग एसटी बस अडकली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरड हटवण्याचे काम जेसीबीच्या मदतीने सुरू करून सुमारे पाच तासांनी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

​जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.