सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील तिलारीजवळ रक्ताने माखलेली कार आणि कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे पुरुषाचा मृतदेह अशा दोन मोठ्या घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दोन्ही ठिकाणांतील मोठे अंतर असूनही कार मालक आणि मृतदेह यांच्यात साधर्म्य आढळल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
कणकवली – साळीस्ते येथे गुरुवारी एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहावर तब्बल १७ वेळा वार केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे हा खून अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयीपणे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना दोडामार्ग तिलारी वसाहतीच्या पुलाजवळ एक नंबर प्लेट नसलेली आणि रक्ताने माखलेली कार आढळली. या कारचा आणि साळीस्ते येथील मृतदेहाचा काहीतरी संबंध असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
बंगळुरुमधील डॉक्टरचा मृतदेह?
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बंगळुरु येथील दोन व्यक्तींना बोलावून घेतले. मात्र, मृतदेहावर झालेल्या अनेक वारांमुळे चेहरा ओळखता न आल्याने खात्रीशीर ओळख पटू शकली नाही, अशी माहिती कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली आहे.
तरीही, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेहाची ओळख श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) अशी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही व्यक्ती डॉक्टर पेशातील असल्याची माहिती मिळत आहे.
तपासाची सूत्रे बंगळुरूकडे
दोडामार्ग येथील बेवारस कारची नंबर प्लेट काढण्यात आली असली तरी, पोलिसांनी चेसिस नंबरवरून श्रीनिवास रेड्डी यांचे नाव निष्पन्न केले आहे. तसेच कणकवली साळिस्ते येथे आढळलेला मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांच्याशी मिळताजुळता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने एक पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या बंगळुरु येथील घराच्या दिशेने रवाना केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत असे म्हटले आहे.
अद्याप अनुत्तरित प्रश्न
- खुनामागील नेमके कारण काय?
- खून कुठे झाला आणि मृतदेह साळीस्ते येथे का फेकला गेला?
- दोडामार्गमध्ये सापडलेली रक्ताने माखलेली कार या घटनेशी नेमकी कशी जोडली गेली आहे?
पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासात गुप्तता पाळली जात आहे. लवकरच या क्रूर खुनाच्या प्रकरणाचा उलगडा होऊन सत्य जनतेसमोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
