सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मडुरा, कास आणि सातोसे परिसरातील शेतकरी ‘ओंकार’ हत्तीच्या दहशतीमुळे हवालदिल झाले आहेत. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून या हत्तीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासधूस केली असून भात कापणी आणि मिरची पिकाची पेरणी थांबली आहे. वन विभाग यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी कास येथे सुरू केलेले उपोषण आंदोलन वन विभागाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
अधिकारी रजेवर, शेतकरी संतापले!
हत्तीच्या उपद्रवाने मोठे नुकसान होऊनही वन विभागाचे अधिकारी “रजेवर आहेत” असे सांगत हात झटकत असल्याने शेतकऱ्यांचा संयम तुटला होता. यामुळे मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले. यावेळी वन विभागाचे अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे मेलद्वारे पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र, “हत्तीचा उपद्रव थांबवणार कोण? आणि आमच्या नुकसानीची भरपाई कोण देणार?” हे प्रश्न अनुत्तरितच राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आंदोलन थांबवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ‘३१ डिसेंबरपर्यंत हत्तीला पकडण्यात येईल’ असे सांगितले असले तरी, वारंवारच्या आश्वासनांमुळे आता शेतकऱ्यांचा वन विभागावरील विश्वास डळमळीत झाला आहे. रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले की, हत्तीच्या भीतीने शेतात मजूर कामाला येत नाहीत, त्यामुळे उभे पीक शेतातच गळून जात आहे. इतर गावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक भात कापणी झाली असली तरी, मडुरा, सातोसे, कास भागात शेतकरी शेतात जाण्याचे धाडस करत नाहीत. रब्बी हंगामासाठीची मिरची पेरणीची कामेही हत्तीच्या दहशतीने थांबली आहेत.
’हत्तीला अन्न देण्यासाठीचा निधी येथे वापरावा’
मडुराचे माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना, हत्तीला खाण्यासाठी जो निधी वापरला जातो, तो निधी वापरून हत्तीला याच भागात अन्न पुरवावे, जेणेकरून त्यांच्या पिकांचे नुकसान थांबेल, अशी मागणी केली.
नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्याची थट्टा!
कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी शासनाच्या नुकसान भरपाईच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शासन प्रति गुंठा फक्त ५९४ रुपये नुकसान भरपाई देते, तर शेतकरी एका गुंठ्यातून ३००० रुपयांचे उत्पादन घेतो. शासनाचे निकष शेतकऱ्यांच्या वास्तवाशी जुळत नसून ही शेतकऱ्याची थट्टा आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
वन विभागाने काही प्रमाणात आश्वासने दिली असली तरी शेतकरी समाधानी नाहीत. ‘दिवाळीच्या नावाखाली अधिकारी रजेवर आणि आम्हाला रोजची सजा’ असा संताप व्यक्त करत, जर हत्तीला लवकरात लवकर पकडले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, सातोसे माजी सरपंच आबा धुरी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास तंटामुक्ती अध्यक्ष बाबू पंडित, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नाटेकर, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलिस पाटील नितीन नाईक, सातोसे ग्रामपंचायत सदस्य बाबू पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.