अलिबाग : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. खालापूर टोल नाका जवळ ही दुर्घटना घडली.

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाका येथे चालकाला डूलकी लागली आणि त्याचे गाडी वरील नियंत्रण सुटले अशी माहिती त्याने दिली. कारने आधी टोयोटा जवळील डिव्हायडरला धडक लागली. त्यानंतर तेथे असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ही धडक बसली.

अपघातग्रस्त वाहनातून पाच जण प्रवास करत होते. यातील वयस्कर आजी आजोबा गंभीर जखमी झाले असून, वाहन चालक त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी यांना किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य ॲम्बुलन्स सर्विस आणि हेल्प फाउंडेशनची पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचाव कार्य केले. ही घटना खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.