छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षेपूर्तीनिमित्त राज्यात मोठ्याप्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडावरही मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. याबाबत आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सराकरला “उपकार करता का?” असा थेट सवाल केला आहे. आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करून उपकार करता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही हे राज्य चालवतो. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण विश्वाचं दैवत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांची वाहवा केली जाते. त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांचं प्रशासन कौशल्य, त्यांची मानवता, त्यांचा निधर्मीवाद या सगळ्या गोष्टींना जगात मान्यता मिळाली असल्याने छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा हा उत्तम प्रकारे करणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. हा महाराष्ट्र जाती धर्माच्या पलिकडे जाऊन महाराजांना नतमस्तक होतो. त्यामुळे राज्याभिषेक सोहळ्याला अभिवादन करतो”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “शिंदेंचं सिंहासन लवकरच…” मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण…”

जागावाटप सुरळीतपणे पार पडेल

लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही चिंता वाटायचं कारण नाही. माझं स्पष्ट मत आहे, लोकसभेचे जागावाटप व्यवस्थित बसून चर्चा होईल. प्रत्येक जागेचा उहापोह केला जाईल. ही जागा कोण जिंकू शकेल, कशाप्रकारे जिंकू शकेल, एकमेकांना कशाप्रकार सहकार्य केलं पाहिजे, त्यासंदर्भात चर्चा करू. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेचं जागावाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत. महाविकास आघाडी ज्याला आम्ही वज्रमुठ म्हणतो ते कायम राहिल, असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बेकायदेशीर सरकारला लाथ मारेल हा आमच्या महाअधिवेशनाचा अजेंडा आहे. शिवसेनेसोबत जी बेईमानी झाली आहे त्यांना नेस्तनाबूत करणे, शिवसेना एक पक्ष म्हणून संघटना म्हणून पुन्हा एकदा शिखरावर घेऊन जाणं हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे”, असंही ते म्हणाले.