सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याचे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर सरकारला पडला आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकार झोपले आहे. त्याविरोधात प्रहार संघटनेने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे ‘चक्का जाम’ आंदोलन केले. बराचवेळ आणि चिवटपणे चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, शहराध्यक्ष जमीर शेख, दत्ता मस्के-पाटील, संजीवनी बारंगुळे यांनी केले. या आंदोलनात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संजीवनी बारंगुळे यांनी बोलताना, विधानसभा निवडणुकीत महायुतीने खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते मागितली. पण नंतर सत्तेवर येताच कर्जमाफी विसरून गेलेल्या महायुती सरकारचे डोके ठिकाणावर आणावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनपैकी एक उपमुख्यमंत्री पद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बार्शी-धाराशिव रस्त्यावरही आंदोलन

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे बार्शी-धाराशिव रस्त्यावर चक्का जाम करण्यात आले. हकीक विमा तत्काळ द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, आदी मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर, प्रशांत काळदाते, दिगंबर रणखांब, रामभाऊ काटे, काकासाहेब गलांडे, अभिजित शिंदे आदींचा सहभाग होता.