भाजपाचे उपमहापौर राजेश काळे सोलापुरातून तडीपार; खंडणीसह अन्य गुन्ह्यांमुळे पोलिसांची कारवाई

सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत.

Solapur deputy mayor rajesh kale Tadipar from Solapur

विविध गंभीर गुन्हे नावावर असलेले सोलापूरचे भाजपाचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना सोलापूर शहर व जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूर शहर पोलिसांनी केली आहे.

सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत. जुळे सोलापूर भागातून भाजपाकडून निवडून आल्यानंतर त्यांना पक्षाने उपमहापौरपदाची संधी दिली होती. पण राजकीय पदाचा दुरूपयोग करून नियमबाह्य पध्दतीने कामे करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ॲट्रासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे आदी विविध सात गंभीर गुन्हे काळे यांच्यावर नोंद आहेत. त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार पोलिसांनी काळे यांच्यावर सोलापूर, उस्मानाबाद आणि इंदापूर (जि. पुणे) येथून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे.

उपमहापौर राजेश काळे हे सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सोलापूर पोलीस आयुक्तालयासह अन्य काही पोलिस स्थानकात देखील गुन्हे दाखल आहेत. तसेच राजेश काळे यांच्यावर पुण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी निगडी व पिंपरी-चिंचवड पोलिसांतही दोन गुन्हे नोंद आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याच्यावर खून व अपहरणासह सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे इत्यादी गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावरही प्रतिबंधात्मक स्वरूपात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यासह इंदापूरमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solapur deputy mayor rajesh kale tadipar from solapur abn

ताज्या बातम्या