सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला होता. शहर व परिसरात सुमारे ३०० सार्वजनिक मंडळांनी महामानव डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा, मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. डॉ. आंबेडकर पार्क चौकात आणि न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी उसळली होती. यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेते व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

काल मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीने डॉ. आंबेडकर जन्माचे स्वागत करण्यात आले. विविध भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय पार्क चौकात येऊन महामानवाच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आणि फुले अर्पण करून नतमस्तक होत होता. न्यू बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर उद्यानात डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही हाच माहोल दिसून आला.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे इंजिन, तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे, बसपाचे नेते राहुल सरवदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद चंदनशिवे आदींनी पार्क चौकात धाव घेऊन डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले. इतर राजकीय पक्षांसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांसह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी महामानवाचे स्मरण केले.

हेही वाचा : सांगली: अंधश्रद्धेतून लिंबाच्या झाडाला टांगला उलटा बोकड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात समस्त आंबेडकरी समाजामध्ये दिवाळीसारखा आंबेडकर जयंतीचा उत्साह असून अनेक घरांवर आकाशदिवे लावण्यात आले आहेत. गोडधोड फराळाची रेलचेल असून अनेक कुटुंबीयांमध्ये लेकी-जावयांचा मानपान होत आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमही राबविले जात असून यात बौध्दिक व्याख्याने, सलग १८ तास अभ्यास आदींचा समावेश आहे. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखंड १८ तास अध्ययन करून महामानवाला अभिवादन केले. येत्या २१ एप्रिल रोजी (रविवारी) मिरवणुकांनी डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवात लोकसभा निवडणुकीचा प्रभाव दिसून येतो.