सोलापूर : वस्तू व सेवा कर कार्यालयातील (जीएसटी) दोन राज्य अधिकाऱ्यांना जीएसटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले. महेश जरीराम चौधरी (वय ४१) आणि राज्य निरीक्षक आमसिद्ध इराप्पा बगले (५०) अशी या दोन्ही आधिकाऱ्यांची नावे आहेत.

येथील एका व्यावसायिकास त्याच्या व्यवसायासाठी जीएसटी प्रमाणपत्र हवे होते. त्याने यासाठी ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज केला होता. ते मिळवण्यासाठी त्याच्याकडे लाचेची रक्कम मागण्यात आली. त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर येथील जुळे सोलापूर, रेणुकानगरी येथील कार्यालयात हा सापळा लावण्यात आला. यांपैकी राज्य निरीक्षक आमसिद्ध बगले याने लाच स्वीकारली. तर त्यांच्याकडून ही लाचेची रक्कम घेताना राज्य कर अधिकारी महेश चौधरी यांना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. यामध्ये पोलीस हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव व राहुल गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई केली.

बार्शीजवळ ७०० किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शी पोलिसांनी आगळगाव-बार्शी रस्त्यावर भोयरे गावात ७०० किलो गांजासह दोन मालमोटारी आणि एक स्विफ्ट कार जप्त केली आहे. त्याची तब्बल सात कोटी ५० लाख रुपयांची किंमत दर्शविण्यात आली आहे. यात उपसरपंचाला अटक करण्यात आली आहे.

दुपारी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी उपविभागाचे पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या पथकाने सापळा लावला. या वेळी एक मालमोटार आणि एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार अडविण्यात आली. छापा टाकल्यानंतर मालमोटारी व आयशरमध्ये भरलेल्या गोण्यांमध्ये गांजाचा साठा आढळला. मालमोटारीत १९६ किलो, तर आयशरमध्ये ४९४ किलो असा मिळून एकूण ६७२ किलो गांजा आढळून आला.

या कारवाईदरम्यान आयशरचालक तथा गावच्या उपसरपंचाला अटक करण्यात आली. मालमोटार आणि स्विफ्ट कार या दोघांचे चालक पसार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई एनडीपीएस कायद्याखाली नोंद करण्यात आली आहे.