सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही तगड्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होत असताना अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाठिंबा देण्यावरून अनेक समाजांमध्ये दोन गट पडल्यामुळे यात कोण बाजी मारणार, याबद्दल सार्वत्रिक कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

विजयासाठी काँग्रेस व भजपमध्ये विविध समाज घटकांचे समर्थन मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मराठा समाजासह कोळी, वडार व इतर समाजामध्ये पाठिंब्याच्या मुद्यावर अहमअहमिका सुरू झाली आहे. प्रचाराला अवघा एक दिवस उरला असून मतदानालाही चार दिवस शिल्लक असताना विविध समाजांमध्ये कोणत्या पक्षाला समर्थन द्यायचे, यावरून हालचाली वाढल्या आहेत.

हेही वाचा – मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास हुकूमशाही; मला तुरुंगात जावे लागेल, सुशीलकुमार शिंदे यांचा भीतीयुक्त इशारा

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची महायुतीच्या विरोधात सुप्त नाराजी असताना सकल मराठा समाज एकीकडे तर मराठा क्रांती मोर्चा दुसरीकडे असल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरात येऊन मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यासह मराठा-कुणबी दोन्ही एकच असल्याच्या मुद्यावर साथ न देणाऱ्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केल्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप समर्थक माथाडी कामगारांचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह एका पत्रकार परिषदेत भाजपला पाठिंबा जाहीर केला. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचाच प्रमुख अडथळा असल्याचा आरोप त्यांनी केला. तर याउलट, संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. संघटनेचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी ही भूमिका सोलापुरात स्पष्ट केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाचे शत्रू असल्याचा आरोप केला.

कोळी महासंघाचे अध्यक्ष, आमदार रमेश चव्हाण यांनी सोलापुरात कोळी समाजाचा मेळावा घेऊन भाजपचे राम सातपुते यांना समर्थन दिले. परंतु त्यानंतर कोळी समाजाच्या इतर संघटनांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. महर्षी वाल्मिकी कोळी समाजाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आमदार रमेश चव्हाण म्हाणजे संपूर्ण समाजाचे मालक नाहीत. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप केला.

हेही वाचा – साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या : अजित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेने काही दिवसांपूर्वी समाजाच्या विकासासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या आश्वासनांची सहा वर्षात कोणतीही पूर्तता झाली नसल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. परंतु नंतर विजय चौगुले यांनी पुन्हा भाजपवर विश्वास दर्शवून पाठिंबा दिला. तर दुसरीकडे वडार समाजाच्या जुन्या संघटनेने बैठक घेऊन काँग्रेसच्या पाठीशी ताकद देण्याचे जाहीर केले. अशाच प्रकारे मोची समाजासह धनगर, बुरूड, जोशी, गोंधळी व अन्य समाजांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा, यावरून विभागणी झाल्यामुळे त्यातून ज्या त्या समाजातील राजकारण तापले आहे.