पंढरपूर : सोलापूर मुंबई विमानसेवेचा उद्या बुधवारी (दि. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात पूरग्रस्त बाधित आणि लाडक्या बहिणीना भाऊबीज म्हणून दिवाळी संच भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याने अनावरणही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यास ते उपस्थित राहणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे.
सोलापूरकरांनी मागणी केल्याप्रमाणे सोलापूर – मुंबई विमानसेवेचा प्रारंभ बुधवारी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले प्रवासी म्हणून मुंबई ते सोलापूर विमानातून येणार आहे. सोलापुरात एका छोटेखानी कार्यक्रमात याचा शुभारंभ केला जाणार आहे. नुकतेच सोलापूर गोवा ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याच वेळी सोलापूर मुंबई ही सेवा सुरु करण्याची मागणी होती. त्याची पूर्तता होत आहे. तसेच पूरग्रस्त बाधितांना दिवाळी भेट देण्याचा कार्यक्रम होणार आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी कीट मुख्यमंत्री यांच्या हस्ते वाटप केले जाणर आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री मुंबई येथून दुपारी सोलापूरच्या विमानाने रवाना होतील. हे विमान ५० मिनिटात सोलापूर येथे पोहचणार आहे असेही गोरे यांनी माहिती दिली.
त्या नंतर माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात कर्मयोगी माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दत्ता भरणे, बाबासाहेब पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आजी, माजी खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका ,महानगरपालिकेच्या तोंडावर मुख्यमंत्री यांचा सोलापूर दौरा आणि या दोन्ही कार्यक्रमात सर्वांना सोबत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
विमानसेवेचे आश्वासन पूर्ण : गोरे
सोलापूर गोव विमानसेवा सुरु केल्यावर विरोधकांनी टीका केली. मात्र लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरु करणार अशी घोषणा केली.यावर विरोधकांनी गँरंटीने सांगते हि विमानसेवा सुरु होणार नाही अशी टीका केली. मात्र आता गँरंटीने सांगतो विमानसेवा सुरु झाली आहे. लवकरच बेंगलोर,तिरुपती येथे विमानसेवा सुरु करू. नवी मुंबई येथील विमानतळ डिसेंबर मध्ये पूर्णपणे कार्यन्वित होत आहे. त्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा सकाळी सुरु होईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली.