सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोनोग्राफी सेंटर तपासणी मोहीम काटेकोरपणे करा, या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नका, सोनोग्राफी तपासणी पथकांनी जिल्हाधिकारी यांना सायंकाळी वेळेत अहवाल पाठवावा. यामध्ये हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुळशीदास मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजस समेळ, सावंतवाडी तहसीलदार विकास पाटील, कणकवली तहसीलदार रवींद्र बाविस्कर, कुडाळ तहसीलदार जयराज देशमुख, दोडामार्ग तहसीलदार विजय तळेकर, मालवण तहसीलदार गीता गायकवाड, वेंगुर्ला तहसीलदार वैशाली पाटील, वैभववाडी तहसीलदार सोमनाथ लोहकरे, देवगड तहसीलदार शेळके यांसह सर्व मेडिकल ऑफिसर्स या बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, एमसीटीसी अहवालानुसार ज्या केंद्रात जास्त प्रमाणात गर्भपात होतात, त्याची कारणे सोनोग्राफी तपासणी पथकांनी नोंद करावीत. तालुकास्तरावर आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांची आठ संयुक्त तपासणी पथके आहेत. त्यांनी आपली तपासणी मोहीम दहा दिवसांत पूर्ण करावी. या कामामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची अथवा कर्मचाऱ्यांनी हयगय करू नये. सोनोग्राफी तपासणी अहवाल जिल्हाधिकारी यांना नियमित वेळेत पाठवावा. तसेच टोल फ्री क्रमांकावर व http://www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर कोणतीही तक्रार प्राप्त नाही ना याबाबतही जनजागृती करण्याचे आदेश आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने म्हणाले, जिल्ह्य़ातील सर्व कार्यान्वित सोनोग्राफी केंद्रांची व ३७ गर्भपात केंद्रांची सखोल तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. सर्व सोनोग्राफी सेंटर्सना एक फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण एक हजार ऑनलाइन एफ फॉर्म भरण्यात आलेले आहेत. त्यापैकी २२४ एफ फॉर्म प्रत्यक्ष सोनोग्राफी केंद्रांना भेटी देऊन तपासण्यात आलेले आहेत. सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत केलेल्या शेडय़ुल एच गटातील उपलब्ध औषधांच्या साठय़ाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंग (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा २००३ ची कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दोन ठिकाणी डिकॉय केसेस पाठवून तपासणी करण्यात आली आहे.
जि. प. स्थायी समितीची आज सभा
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजता बॅ. नाथ पै समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव स्थायी समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
सोनोग्राफी तपासणी अहवाल पाठविणे बंधनकारक
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोनोग्राफी सेंटर तपासणी मोहीम काटेकोरपणे करा, या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नका, सोनोग्राफी तपासणी पथकांनी जिल्हाधिकारी यांना सायंकाळी वेळेत अहवाल पाठवावा. यामध्ये हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी दिला.
First published on: 22-01-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonography report must send to district collector