अहिल्यानगर : गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या तीन जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. गोवंशीय टोळीविरुद्ध यापूर्वीही त्यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. टोळीप्रमुख वसीम कादिर कुरेशी (२८, हमालवाडा, आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर), आदिल अमीन कुरेशी (२०, सदर बाजार, भिंगार), शफिक नूर कुरेशी (५०, सदर बाजार भिंगार यांना हद्दपार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. वसीम कादिर कुरेशी याने गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याची मांस विक्री करण्याच्या उद्देशाने टोळी तयार केली होती. या टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली होती.
या टोळीने सन २०२३ ते २०२५ दरम्यान अनेकदा गुन्हे केले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, या टोळीच्या कृत्यांना पायबंद बसला नाही. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याकडे पाठवला होता.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यासाठी शिफारस केली होती. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सखोल चौकशी करत या तिघांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांच्या टोळीचा बिमोड करण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध हद्दपारची कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.