रत्नागिरी : कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणा कडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील व राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहे. कोकणात मासेमारी बरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत.

कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षितपणे थांबवीणे सहज शक्य होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्कर करता येणार आहे. नव्याने मंजुरी मिळालेल्या या जेटींच्या देखील कामांना लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टी जास्तीत जास्त पर्यटकांनी गजबजणार आहे. या नव्या जेटी कोकणच्या विकासाला हातभार लावणार असून या विकासकामांमुळे केवळ मासेमारी आणि पर्यटनच नाही तर संपूर्ण कोकणच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जावून यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.