कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यासाठी शून्य पाणी निर्गत (झेडएलडी ) ६१० कोटी रुपये खर्चाच्या निविदेस राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी वस्त्रोद्योग क्लस्टर योजनेच्या माध्यमातून शहरात २० वर्षांपूर्वी १२ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारला होता.
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मे महिन्यात ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीत आले होते. तेव्हा कापड प्रक्रियेनंतर प्रोसेस उद्योगातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याची बाब समोर आली होती. त्यातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी झेडएलडी प्रकल्प उभारण्यास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
निधीची तरतूद
सीईटीपी प्रकल्पांचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी २५ टक्के आणि उद्योग विभागाकडून ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्प राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे देण्यात आली आहे.
प्रकल्प कोठे होणार ?
इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत १५, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील ३ तर आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत ५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या निविदेला शासनाने मंजुरी दिली आहे. हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.