मुंबई : राज्यात सर्वदूर दमदार सरी पडल्यामुळे शेतशिवार अबादानी झाली आहेत. काही अपवाद वगळता खरीप पेरण्या उरकल्या आहेत. जुलैअखेरीस उर्वरीत पेरण्याही होऊन खरीप हंगाम सरासरी गाठेल, अशी स्थिती आहे. खरिपातील सरासरी पेरणी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर असून, २५ जुलैपर्यंत ९२ टक्के म्हणजे, १३२.१८ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शेतशिवारं हिरवीगार झाली आहेत. अद्यापपर्यंत पावसाने चांगली साथ दिल्यामुळे पिके जोमात आहेत.
राज्यात एक जून ते २५ जुलै, या काळात सरासरी ४७४.५ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा प्रत्यक्षात ९१ टक्के म्हणजे, ४३२.२ मिमी पाऊस पडला आहे. चांगला आणि सर्वदूर पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्याही चांगल्या झाल्या आहेत. राज्यभरात खरीप हंगामात ऊस वगळता १४४.३६ लाख हेक्टर पेरणी होते, त्यापैकी २५ जुलैअखेर १३२.१८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ९२ टक्के आहे.
सरासरीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वांधिक १२१ टक्के पेरा झाला आहे. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वर्धा आणि बुलढाण्यात सरासरी इतका म्हणजे १०० टक्के पेरा झाला आहे. भात लागवडी होत असलेल्या जिल्ह्यांत भात लागवड रखडल्यामुळे पेरण्या रखडल्याची स्थिती आहे. जूनच्या पहिल्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्यामुळे भात रोपे टाकण्यास उशीर झाला होता. त्यामुळे भात लावणी साधारण १५ दिवस उशिराने सुरू झाली आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यात सरासरीच्या सर्वात कमी ४३ टक्के पेरणी झाली आहे. तर गोंदियात ५१ टक्के, गडचिरोलीत ५६ टक्के, रत्नागिरीत ५८ टक्के आणि रायगडमध्ये ६७ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या दरात पडझड झाल्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. तरीही सरासरीपेक्षा जास्त १०२ टक्के पेरा झाला आहे. मक्याची आघाडी कायम असून, १४७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. उडीद, तूर आणि कापसाने सरासरी गाठली आहे.
२८ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरा
राज्यात प्रामुख्याने भात लागवड होणाऱ्या २८ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पेरा झाला आहे. त्यात पनवेल, गुहागर, लांजा, सुरगाणा, नाशिक, पेठ, सातारा, पाटण, शिराळा, रामटेक, मौदा, भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी, गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, तिरोडा, आमगाव, सिंदेवाही, कुरखेडा, अहेरी, पट्टापल्ली, देसाईगंज (वडसा) आणि मुलचेरा या तालुक्यांचा समावेश आहे. जुलैअखेर भात लागवडी पूर्ण होऊन सरासरी पेरा होण्याचा अंदाज आहे.
पिके जोरदार, चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा
राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्यांनी सरासरी गाठली आहे. जुलैअखेर उर्वरीत पेरण्या पूर्ण होतील. पिकांची स्थिती चांगली असून, दमदार उत्पादन अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती कृषी संचालक (विस्तार आणि प्रशिक्षण) रफीक नाईकवाडी यांनी दिली.