Yogesh Kadam on Arm License Case: कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ विरोधात पुणे पोलीस आता कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान दोन दिवसांपासून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना लक्ष्य केले होते. या प्रकरणी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांची पाठराखण केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांची बाजू उचलून धरली. त्यानंतर योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट टाकून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
परवाना दिलाच नाही – मुख्यमंत्री
सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देता येणार नाही, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितल्यानंतर गृह राज्यमंत्र्यांनी याबद्दल सुनावणी घेऊन शस्त्र परवान्यासाठी मंजुरी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य होता. पण परवाना दिलेला नाही.”
शस्त्र परवाना दिलाच गेला नाही, त्यामुळे योगेश कदम यांना दोषी धरता येणार नाही, असे सांगितल्यानंतर योगेश कदम यांनीही सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत विरोधकांना टोला लगावला आहे.
माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न
योगेश कदम म्हणाले, “२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.”
“पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार!”, असे योगेश कदम या पोस्टमध्ये म्हणाले.
दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती, अशी खंतही योगेश कदम यांनी व्यक्त केली.