एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी

बदल्यांना महामंडळाने प्रशासकीय बदल्यांचे नाव दिले असले तरीही प्रत्यक्षात संपात सामील झाल्याचे प्रमुख कारण आहे.

st-bus-1

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महामंडळाने सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवा समाप्तीची कारवाई करतानाच आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपात सहभागी होऊन समाजमाध्यमावरून संस्थेचा अपप्रचार करणे याशिवाय कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्यांना महामंडळाने प्रशासकीय बदल्यांचे नाव दिले असले तरीही प्रत्यक्षात संपात सामील झाल्याचे प्रमुख कारण आहे. दरम्यान, दुसरीकडे एसटी महामंडळाने मेस्माची पूर्वतयारीही सुरू केली असून आंदोलनात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांची आगारनिहाय यादी तयार केली जात आहे.कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे यासाठी ४१ टक्के वेतनवाढ दिली. तरीही कर्मचारी संप मागे घेत नसल्याने आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचाच निर्णय घेतला आहे.

 जे कर्मचारी संपात सक्रिय आहे आणि त्यांच्याकडून समाजमाध्यमावरून संस्थेबद्दल अपप्रचार करणे, अफवा पसरवून कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून रोखणे, आगाराच्या प्रवेशद्वारावर िहसक आंदोलन सुरू ठेवणे, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे अशी कृत्ये करून प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला जात आहे. अशा संपकरी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ६२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी कर्मचाऱ्यांना कुटुंब सुरक्षा योजनेअंतर्गत अटी व शर्तीनुसार पुनर्नेमणूक देण्याबाबत एसटी महामंडळाने १ एप्रिल २०१६ रोजी ठराव केला होता. त्यावेळी केवळ एक वेळचा पर्याय म्हणून पुनर्नेमणूक देण्याचा निर्णय घेतला. या कर्मचाऱ्यांना नेमणूक देतेवेळी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पुनर्नेमणूक दिल्यानंतर संबंधित कर्मचारी पुन्हा विनाकारणाशिवाय वारंवार किंवा विनाकारण दीर्घकालीन रजेवर राहिल्यास शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फ करण्यात यावे, असे स्वखुशीने प्रतिज्ञापत्र कार्यालयाला सादर केले आहे.

 अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर होण्याच्याही सूचना करण्यात याव्यात. हजर न झाल्यास पुढील कार्यवाही करावी, असे आदेश एसटी महामंडळाच्या राज्यातील विविध एसटी विभागाने संबंधित अधिकाऱ्यांनाही दिले आहेत.

‘मेस्मा’ची पूर्वतयारी .. एसटी महामंडळाने मेस्माची पूर्वतयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. आंदोलनात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांची आगारनिहाय यादी तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाकडून आगारप्रमुख, विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. आगाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार करण्याची सूचना आगारप्रमुखांना दिली आहे. त्यानुसार राज्यातील आगारप्रमुखांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रार नोंदविण्यास सुरुवातही केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Striking st employees face transfer zws

ताज्या बातम्या