डोंबिवलीत अल्पवयीन मुलींचे विनयभंग करणाऱ्या विद्यार्थ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमन यादव असे त्याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका तरुणाने केला होता. त्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं असता दुचाकीवरून आलेल्या तरुणाने विनयभंग केल्याचे उघड झाले होते. या तरुणाकडे यूनिकॉर्न दुचाकी आहे. कल्याण डोंबिवलीतील एकूण १० हजार युनिकॉर्न दुचाकींपैकी ३५०० दुचाकींची तपासणी करण्यात आली.
सोनारपाडा भागात ८० युनिकॉन दुचाकी आढळून आल्या. सोनारपाडा भागात तपास करताना पोलिसांना अमनचा शोध लागला. सीसीटीव्हीमधील आणि अमनची दुचाकी यामधील सारखेपणा दिसून आला. चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर अमनला अटक करण्यात आली. तर दुचाकी ताब्यात घेण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.